नांदेड, दि. 1 ऑक्टोबर : (प्रतिनिधी)
“ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी भारतीय परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या प्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मला कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय भवन येथे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक व सामाजिक समस्यांची नोंद घेऊन त्यावर मार्गदर्शन केले जात आहे. शासनाच्या वयोश्री व तीर्थदर्शन योजनेचा नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. तसेच राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.”
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण गायके यांनी मानले. ✅












