नांदेड दि. 1 ऑक्टोबर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला मोठी गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतींना विनामूल्य वेबसाईट प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी तसेच संगणक चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाचे मार्गदर्शन निडली ॲप चे भुतडा यांनी केले. आतापर्यंत जिल्ह्यातील 700 हून अधिक ग्रामपंचायतींनी स्वतःची संकेतस्थळे सुरू केली असून जिल्ह्याच्या विकास प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे अधिकारी वर्गाने नमूद केले.
गावांची वेबसाईट ही केवळ ऑनलाइन ओळख न राहता गावाच्या सर्वांगीण प्रगतीचे द्योतक ठरणार आहे. यावर गावाची मूलभूत माहिती, शासकीय योजना व त्यांचे लाभार्थी यांची यादी प्रकाशित होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कामकाज अधिक पारदर्शक होईल तसेच नागरिकांना माहिती एका क्लिकवर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.
या अभियानात शंभर गुणांचे मूल्यांकन होत असून प्रत्येक गुणाला महत्त्व आहे. संकेतस्थळासाठीही गुण दिले जाणार असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने हा उपक्रम प्रामाणिकपणे राबवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांनी केले.
👉 नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या डिजिटल प्रवासाची ही नवी सुरुवात ग्रामविकासात क्रांतिकारी ठरण्याची शक्यता आहे.












