नांदेड, दि. ९ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, दारू पिणे, आणि शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली “सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत विविध पोलिस ठाण्यांनी धडक कारवाई केली.
या कारवाईत शहरातील विविध भागांतील पोलिस ठाण्यांनी गस्त घालून सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणाऱ्या इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०/११७ अंतर्गत गुन्हे नोंदवले. तसेच हॉटेल, वाईन शॉप व हॉटेल चेकिंगही करण्यात आले.
प्रमुख कारवाई :
- पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण :
पोलिस अमंलदारांनी दोन इसमांवर शांतता भंग केल्याप्रकरणी कलम ११०/११७ अंतर्गत गुन्हे नोंदवले. तसेच हद्दीतील दारूचे दुकान, वाईन शॉप आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. - पोलिस ठाणे विमानतळ :
विमानतळ चौक परिसरात एका इसमावर शांतता भंग प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित भागात हॉटेल्स व वाईन शॉप तपासण्यात आले. - पोलिस ठाणे वजिराबाद :
वजिराबाद चौक परिसरात दोन इसम शांतता भंग करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी हद्दीतील व्यवसायिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली. - पोलिस ठाणे भग्यनगर :
भग्यनगर परिसरात दोन इसमांवर शांतता भंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हॉटेल्स व दारू विक्री केंद्रांची पाहणी करण्यात आली. - पोलिस ठाणे शिवाजीनगर :
शिवाजीनगरात एक इसम सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करीत असल्याने त्याच्यावर कलम ११०/११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य बँकेसमोरील विविध ठिकाणी तपासणी झाली. - पोलिस ठाणे इतवारा:
इटवारा परिसरात जुन्या मोडक चौकाजवळ एका इसमावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी इतर संशयित व्यक्तींनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. - दक्षिण पथक :
दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंगदरम्यान बसस्थानकाजवळ दोन इसमांवर कारवाई केली. त्यांच्यावर देखील कलम ११०/११७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “शहरातील सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन, गोंधळ किंवा शांततेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहील. नागरिकांनीही अशा प्रकारच्या घटनांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे.”
या मोहिमेमुळे नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा अधिक प्रभावीपणे अंमल होत असल्याचे दिसून येत आहे.












