नांदेड, दि. 29 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : माधव वाघमारे
हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, जी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी आहे, यांच्यामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी मुख्यालय मुंबईकडून उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महामंडळ नांदेड यांनी केले आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून हिंदु खाटीक समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जून 2025 रोजी या महामंडळाची स्थापना केली. या अंतर्गत अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, तसेच एनएसएफडीसी कर्ज योजना अशा अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
🔹 अनुदान योजना
या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतो.
- महामंडळाचे अनुदान : ₹25,000
- बँकेचे कर्ज : ₹25,000
एकूण ₹50,000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
🔹 बीजभांडवल योजना
या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
- महामंडळाचा सहभाग (अनुदानासह) : 20%
- बँकेचा सहभाग : 75%
- अर्जदाराचा सहभाग : 5%
या योजनेतून स्वयंरोजगारासाठी आवश्यक भांडवल पुरवले जाते.
🔹 थेट कर्ज योजना
या योजनेत महामंडळाकडून थेट आर्थिक सहाय्य दिले जाते.
- एकूण कर्ज रक्कम : ₹1 लाख
- महामंडळाचे अनुदान : ₹50,000
- कर्ज (व्याजदर 4%) : ₹45,000
- अर्जदाराचा सहभाग : ₹5,000
🔹 एनएसएफडीसी कर्ज योजना
या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतो.
- एनएसएफडीसी महामंडळाचा सहभाग : 75%
- बीजभांडवल (अनुदानासह) : 20%
- अर्जदाराचा सहभाग : 5%
लाभार्थी हा हिंदु खाटीक समाजातील असावा.
या योजनेतून समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा उदरनिर्वाह साधण्यासाठी व स्वयंरोजगार निर्मितीसाठी किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, रेडिमेड गारमेंट्स इत्यादी लघुउद्योगांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजना भौतिक उद्दिष्ट आर्थिक उद्दिष्ट (अनुदान) बीजभांडवल / कर्ज अनुदान योजना (₹50,000 पर्यंत) 10 ₹5 लाख निरंक बीजभांडवल योजना (₹5 लाख पर्यंत) 10 ₹5 लाख ₹4.50 लाख थेट कर्ज योजना (₹1 लाख पर्यंत) 5 ₹2.50 लाख ₹2.25 लाख एनएसएफडीसी योजना (₹1.40 ते ₹5 लाख) 12 निरंक निरंक
महामंडळाने जाहीर केलेल्या या योजना समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी जिल्हा कार्यालय नांदेडतर्फे जनजागृती सुरू आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालय, हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, नांदेड येथे आवश्यक कागदपत्रांसह त्वरित अर्ज सादर करावा.











