नांदेड, दि. ३ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे 
शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखा इत्तवारा यांच्या नेतृत्वाखाली आज विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहनचालक, तसेच रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. राजकुमार हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदारांनी जुना मोंढा परिसर, दंगल नियंत्रण पथकाच्या सहाय्याने विविध ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारे, परवाना नसलेले चालक, तसेच फुटपाथ व रस्त्यावर फळे विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मोहीमेदरम्यान एकूण ८३ वाहतूक नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आली असून, संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग करणारे व अतिक्रमण करणारे व्यावसायिक यांच्यावरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “शहरातील वाहतूक शिस्त राखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. अवैध वाहतूक, विनापरवाना वाहन चालविणे, रस्त्यावर अतिक्रमण करणे या गोष्टींमुळे अपघात व वाहतूककोंडी वाढते. नियमांचे पालन करणे सर्वांनी आवश्यक आहे.
या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, मार्गदर्शन अधिकारी / अंमलदार शहर वाहतूक शाखा इत्तवारा, तसेच दंगल नियंत्रण पथकाचे पोलिस अमलदार यांनी सहभाग घेतला.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील आणि नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.











