नांदेड, दि. 12 जानेवारी 2026 (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत 2+ स्कीममधील सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृती कायदा (MPDA) अंतर्गत ‘स्थानबद्ध’ कारवाई केली आहे. पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली.
स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव कश्यप उर्फ लक्की पी. सुनील हाटकर (वय 20 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. भाग्यनगर, नांदेड) असे आहे. सदर गुन्हेगाराविरुद्ध शस्त्र बाळगणे व वापरणे, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करणे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याची दहशत परिसरात निर्माण झाली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे (पोलीस स्टेशन भाग्यनगर) यांनी पार पाडली. यासह अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व श्री. सूरज गुरव (नांदेड) यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नांदेड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी MPDA अंतर्गत प्रभावी कारवाई सुरू असून सन 2025 मध्ये 37 तर सन 2026 या चालू वर्षात आतापर्यंत 06 सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत एकूण 55 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर गुन्हेगारास एक वर्ष कालावधीसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांच्या मान्यतेने दिनांक 12/01/2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नांदेड पोलिसांची ही धडक कारवाई म्हणजे कायदा हातात घेणाऱ्यांसाठी कडक इशारा असून, शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.












