नांदेड – विमानतळ पोलिस ठाण्याच्या वतीने ७ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा यशस्वी शोध घेऊन त्याला सुरक्षितरित्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
गणेश संभाजी भारतवाडे (वय २६, रा. शारदा नगर, नांदेड) हा मुलगा दिनांक ०२/१२/२०१८ रोजी बेपत्ता झाला होता. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात मिसिंग गुन्हा क्रमांक १६/२०१९ दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल रगमाळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सतत तपास सुरू ठेवला.
सदर तपासादरम्यान विविध ठिकाणी शोध मोहीम राबवून अखेर दिनांक १७/०५/२०१९ रोजी सकाळी ११.०४ वा. हरवलेला गणेश भारतवाडे याचा शोध लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केला. मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले आणि पोलिसांच्या तत्पर व कष्टपूर्वक केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. आबिनाश कुमार यांनी विमानतळ पोलिसांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.











