नांदेड: २५ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
उद्या, २६ मार्च रोजी श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त नांदेड शहर आणि ग्रामीण भागात हिंदू बांधवांच्या वतीने भव्य शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस अधीक्षक अभिनაშ कुमार यांनी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी विशेष अधिसूचना जारी केली आहे. गुरुवारी सकाळी १०:०० वाजल्यापासून रात्री २४:०० वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
असा असेल शोभा यात्रेचा मार्ग
मुख्य शोभा यात्रा शास्त्री मार्केट – जुना मोंढा – महाविर चौक – वजिराबाद चौक – कलामंदिर – शिवाजीनगर – आयटीआय चौक – वर्कशॉप कॉर्नर – ते हनुमान मंदिर अशोकनगर या मार्गाने मार्गस्थ होणार आहे.
वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असलेले मार्ग:
१. वर्की चौक ते वर्कशॉप कॉर्नर: वर्की चौक – जुना मोंढा – देना बँक – महाविर चौक – तरोडकर मार्केट – वजिराबाद चौक – कलामंदिर – शिवाजीनगर – आयटीआय चौक – श्रीनगर ते वर्कशॉप कॉर्नरपर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
२. सिडको-हडको ते जुना मोंढा: नवीन पुल मार्गे जुना मोंढाकडे येणारी वाहतूक बंद राहील.
३. पावडेवाडी नाका ते शासकीय विश्रामगृह: या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
४. रविनगर – कौठा – गोवर्धन घाट: या पुलावरून वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.
५. राज कॉर्नर ते आयटीआय: वर्कशॉप टी-पॉईंट ते आयटीआयपर्यंत डाव्या बाजूची वाहतूक बंद असेल.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:
वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने खालील पर्यायी मार्ग सुचवले आहेत:
- जुना मोंढाकडे जाण्यासाठी: वर्की चौकाकडून हबीब टॉकीज – महमंद अली रोड – केळी मार्केट – गिटी क्रेशर रोडचा वापर करावा.
- श्रीनगर/वर्कशॉपकडे जाण्यासाठी: वजिराबाद चौकाकडून सिडको-हडकोकडे जाणारी वाहतूक गोवर्धन घाट पुल – तिरंगा चौक – पोलीस मुख्यालय – पक्की चाळ – खडकपुरा – लालवाडी अंडरब्रिज – पिवळी गिरणी – गणेश नगर – पावडवाडी नाका – मोर चौक मार्गे कॅनोल रोड बायपासने वळवण्यात आली आहे.
- राज कॉर्नर ते जुना मोंढा: राज कॉर्नर – शिव मंदिर – पिरबुऱ्हाण चौक – आनंदनगर चौक – नाईक चौक – अण्णा भाऊ साठे चौक – यात्रीनिवास पोलीस चौकी – अबचल नगर मार्गाचा वापर करावा.
- पावडेवाडी नाका ते विश्रामगृह: ही वाहतूक मोर चौक आणि छत्रपती चौक मार्गे जाईल.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.











