नांदेड, दि. 17 सप्टेंबर :- गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ आज पिंपळगांव (म.) येथे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.
पिंपळगांव (म.) येथे आयोजित कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, सहायक जिल्हाधिकारी अनन्या रेडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.
प्र.) राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी, सरपंच वर्षा खंडागळे यांच्यासह गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी शंभर दिवसाचा असून या कालावधीत गावस्तरावर अभियानाचे मुख्य सात घटक आहेत. यामध्ये सुशासन, आर्थिक स्वावलंबन, जलसमृद्धी, योजनांचे अभिसरण, संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि लोकसहभाग यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.












