नांदेड (दि. 01 ऑक्टोबर) :
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड शहर) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनातून शहरातील विविध भागांमध्ये सिटी सेफ्टी पथकांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून शांतता भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांची विभागनिहाय कारवाई
- पोलीस स्टेशन भाग्यनगर :
भाग्यनगर परिसरातील छत्रपती चौक वाजिराबाद चौक, भगीरथ नगर अशोक नगर या भागात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ इसमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हॉटेल, वाईन शॉप यांचीही तपासणी करण्यात आली. - पोलीस स्टेशन वाजिराबाद :
वाजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिटी सेफ्टी पथकांनी कारवाई करताना १ इसम दारू सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्याच्याविरोधात कलम ११०/११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल्स, वाईन शॉप्सची तपासणीही करण्यात आली. - पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण :
ढवळे चौक परिसरात १ इसम दारू पिऊन गोंधळ करत असल्याचे आढळले. त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. यासोबतच परिसरातील वाईन शॉप्सची तपासणीही करण्यात आली. - पोलीस स्टेशन शिवाजीनगर :
अण्णाभाऊ साठे चौक, नवा मोंढा , कविता स्टेशनरी परिसरात ४ इसमांविरोधात कारवाई करण्यात आली. हे सर्व इसम दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्यांच्यावर कलम ११०/११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हॉटेल्स व वाईन शॉप्सवर तपासणी करण्यात आली. - दामिनी पथक :
पेट्रोलिंग दरम्यान दामिनी पथकाने विसावा गार्डन परिसरात ४ इसम दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांचा इशारा
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी इशारा दिला आहे की, नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून गोंधळ घालणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील. नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रकारांविरोधात तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
👉 नांदेड पोलिसांचे आवाहन : सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, कायद्याने कठोर कारवाई केली जाईल.












