नांदेड, दि. 11 ऑक्टोबर 2025 :
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, गर्दी, व मद्यपान करून शांतीभंग करणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड पोलिसांनी “सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळेत तपासणी, संशयितांची झडती, तसेच हातगाडी, बार, वाईन शॉप, हॉटेल्स यांची चौकशी करण्यात आली. या मोहीमेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कलम 110/117 म. पो. कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
विभागनिहाय कारवाई पुढीलप्रमाणे:
1️⃣ पोलीस स्टेशन भाग्यनगर:
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्हअंतर्गत दोन महिन्यांपासून नियमितपणे कारवाई सुरू असून, अॅशोक नगर परिसरातील 03 इसमांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. तसेच हातगाडी ठेवल्या जाणाऱ्या जागांची तपासणी, बार, हॉटेल तपासणी करण्यात आली.
2️⃣ पोलीस स्टेशन शिवाजीनगर:
या विभागात एक महिन्याच्या कालावधीत 01 इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच परिसरातील दुकान, बार आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
3️⃣ पोलीस स्टेशन इटवारा:
या ठिकाणी दोन महिन्यांत 02 इसमांविरुद्ध कारवाई. पोलिसांनी रात्री गस्त घालून संशयितांवर कारवाई केली.
4️⃣ पोलीस स्टेशन वजिराबाद:
येथे दोन महिन्यांत 02 इसमांविरुद्ध कारवाई. वजिराबाद चौकात पोलिसांनी गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक केली.
5️⃣ पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण:
या विभागात एका महिन्याच्या कालावधीत 01 इसमाविरुद्ध कारवाई. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई केली.
6️⃣ धनश्री पथक:
धनश्री पथकानेही पेट्रोलिंगदरम्यान शहरातील विविध ठिकाणी गस्त घालत शांतीभंग करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर व इटवारा ठाण्यात गुन्हे दाखल केले.
या संपूर्ण मोहिमेचा उद्देश नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांवर अंकुश ठेवणे हा आहे.
पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी कोणीही अनुचित वर्तन करत असल्यास किंवा शांतीभंग होत असल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.












