नांदेड दि. 20 फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यातील 178 केंद्रांवर आजपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा शांततेत पार पडली असली, तरी परीक्षा केंद्रांच्या परिसरात आढळलेल्या अनधिकृत व्यक्तींमुळे प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 चा हवाला देत जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी उद्यापासून अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकूण 44 हजार 991 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 43 हजार 949 विद्यार्थी उपस्थित होते, म्हणजेच 97.68 टक्के उपस्थिती नोंदवली गेली. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी प्रशासनाने सर्व केंद्रांवर बैठे पथके, झूम वेबकास्टिंग, ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे कडेकोट नजर ठेवली होती. त्यामुळे आजची परीक्षा कुठल्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, काही केंद्रांवर परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती परिसरात फिरताना आढळून आल्या आहेत. विशेषतः सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी आज इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान दहेली तांडा केंद्राला दिलेल्या भेटीत अनेक अनधिकृत आणि ओळखपत्रविरहित व्यक्ती परीक्षा केंद्राच्या परिसरात फिरताना आढळून आल्या. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रांवर कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, उद्यापासून (दि. 21 फेब्रुवारी) इयत्ता बारावी तसेच उर्वरित दहावीच्या परीक्षांदरम्यान केंद्र परिसरात परीक्षेशी संबंध नसलेली कोणतीही व्यक्ती आढळल्यास ती व्यक्ती शाळेचा कर्मचारी किंवा संस्थेचा प्रतिनिधी असली तरी तिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 163 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
उद्या इयत्ता बारावीचा महत्त्वाचा गणित विषयाचा पेपर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्या या कडक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर शिस्त कायम राहण्यास मदत होणार आहे. दरम्यान, परीक्षांच्या या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांकडून प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.












