नांदेड, दि. 11 सप्टेंबर : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत या कालावधीत संपूर्ण राज्यात “सेवा पंधरवाडा” मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. याच तयारीचा भाग म्हणून तहसील कार्यालय नांदेड येथे 11 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीला उपस्थित
ही बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी तहसीलदार संजय वारकड विशेष उपस्थित होते. बैठकीस नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, सुनील माचेवाड,देवीदास जाधव, सहाय्यक महसुल अधिकारी , महसूल सहाय्यक व्यंकटी मुंडे, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या आदेशानुसार “सेवा पंधरवाडा” तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे –
1️⃣ पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर) – पाणंद रस्ते विषयक मोहिम : गावांमधील पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच संमतीपत्रे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
2️⃣ दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर) – ‘सर्वासाठी घरे’ उपक्रम : या उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप, अनधिकृत बांधकामांचे नियमन आणि निवासी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे.
3️⃣ तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) – नाविन्यपूर्ण उपक्रम : यामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी निश्चित केल्याप्रमाणे खालील तीन कामांचा यामध्ये समावेश आहे. गाव तिथे स्मशानभूमी, शासकीय जमिनी व गायरान याला जिओ फेनसिंग करणे, तक्रार निवारणाच्या अनुषंगाने व्हाट्सअप चॅटबॉट तयार करून तक्रारीचे तात्काळ निवारण करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असून, गावकऱ्यांना थेट फायदा होईल अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की, “सेवा पंधरवाडा हा केवळ एक उपक्रम नसून तो लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक आहे. प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यामध्ये जबाबदारीने सहभाग घेतल्यास लोकांना थेट न्याय व सुविधा मिळतील.”
तसेच तहसीलदार संजय वारकड यांनी स्पष्ट केले की, “गावपातळीवर जनतेपर्यंत प्रशासन पोहोचवणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. सर्वांनी समन्वयाने काम करून या उपक्रमाला तालुक्यात आदर्श ठरवावे.”
तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी निर्धार
बैठकीत सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांनीही एकमताने सहभागाची तयारी दर्शवली. “गावोगावी उपक्रम राबविताना लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देऊ,” असा निर्धार यावेळी करण्यात आला.
प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा
“सेवा पंधरवाडा”मुळे ग्रामीण भागातील प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असून, लोकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रशासन व ग्रामपातळीवरील कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी होणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आले.












