प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड, दि. ४ मार्च: मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असून इंधनदरात मोठी वाढ होणार असल्याच्या अफवांनी जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. या अफवांमुळे नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.
मात्र, जिल्हा प्रशासनाने या सर्व अफवांना पूर्णपणे खोटे ठरवत नागरिकांना कोणत्याही प्रकारची भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा साठा पुरेसा असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. इंधनदरवाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेऊ नये, तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी शिस्त राखावी, असेही यावेळी सांगण्यात आले.












