नांदेड, दि. 6 नोव्हेंबर – नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा या 12 नगरपरिषदेसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे संपूर्ण क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. “आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्या; आचारसंहिता प्रभावीपणे राबवा” असेही त्यांनी सर्व यंत्रणांना स्पष्टपणे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पडाव्यात यासाठी 5 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अध्यक्षस्थानी होते. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी उपस्थित होते.
बॅनर्स-पोस्टर्स त्वरित हटवा – आदेश
आचारसंहिता लागू झाल्याने नगर क्षेत्रातील सर्व राजकीय बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढून टाकणे, भिंतीवरील राजकीय मजकूर पुसणे तसेच पक्षांचे बोर्ड हटवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.
तसेच मतदार यादीतील दुबार-तिबार नावांवर आयोगाच्या आदेशानुसार तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
कायदा-सुव्यवस्थेवर विशेष भर
निवडणूक काळात संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस उपविभागीय अधिकार्यांना सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले. “अनुचित प्रकार कुठेही घडू देऊ नका, उल्लंघनाच्या प्रत्येक बाबीवर तत्काळ कारवाई व्हावी,” असेही श्री. कर्डिले म्हणाले.
निवडणूक कामकाज वेळेत पूर्ण करा
नियुक्त सर्व निर्णय अधिकारी यांनी आयोगाच्या निर्देशांनुसार सर्व निवडणूक विषयक काम तात्काळ व नियमानुसार वेळेत पूर्ण करावे. लोकशाहीची मूल्ये जपत ही सार्वत्रिक निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष, निर्भय व शांततेने पार पडेल याची दक्षता घ्यावी, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला.












