डॉ — ‘Dean’s Address’ कार्यक्रम उत्साहात पार पडला
नांदेड, दि. ८ ऑक्टोबर – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे नवीन प्रवेशित एम.बी.बी.एस. (2025-26) विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित ‘Dean’s Address’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणातील शैक्षणिक, नैतिक आणि व्यावसायिक मूल्यांची ओळख करून देणारा ठरला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भास्करराव देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. सुनिल वेदपाठक उपस्थित होते. कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. शितल राठोड, डॉ. वंदना दुधमल, डॉ. इस्माईल इनामदार, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. हुमेरा खान, डॉ. किशोर राठोड, डॉ. मोहम्मद समीर, डॉ. मारोती डाके, डॉ. मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हा न्यायाधीश श्री. वेदपाठक म्हणाले, “डॉक्टर हा केवळ व्यवसाय नाही, तर समाजसेवेचा संकल्प आहे. भविष्यातील लोकाभिमुख डॉक्टर म्हणून विद्यार्थ्यांनी तन, मन आणि धनाने अभ्यास करावा. रुग्णसेवा हाच डॉक्टरांचा धर्म आहे.”
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले, “वैद्यकीय शिक्षण हा केवळ अभ्यासक्रम नसून आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक विषयाचे सखोल अध्ययन करा, व्याख्यानांना नियमित उपस्थित राहा आणि शंका त्वरित शिक्षकांकडून दूर करा. तसेच सहाध्यायींनाही प्रेरित करा.” त्यांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे नियम, कायदेशीर तरतुदी आणि ॲन्टी-रॅगिंगविषयी सविस्तर माहिती दिली.
शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना दुधमल यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “पांढरा कोट हा केवळ पोशाख नाही, तर जबाबदारी आणि विश्वासाचे प्रतीक आहे. तो सन्मानपूर्वक परिधान करा.” त्यांनी अधिष्ठात्यांबद्दल बोलताना म्हटले की, “अधिष्ठाता हे केवळ प्रशासकीय प्रमुख नसून ज्ञान, शिस्त आणि मूल्यांचे प्रतीक आहेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना दुधमल यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. मुजतबा नौशिन आणि डॉ. भागवत खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी डॉ. मसरत फिरदोस, डॉ. सीमा टाकरस, डॉ. अनुभ्राता मुखर्जी, डॉ. अक्षयकुमार, डॉ. अनिरुद्ध मुनेश्वर, डॉ. मोहम्मद अली, किशोर भांगे, माधव केंद्रे, सदानंद कदम, फुलकली चिंडालिया, विजू गोहील आणि आकाश भालेराव यांनी परिश्रम घेतले.
हा स्वागत समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी, सेवा आणि नैतिकतेची जाणीव करून देणारा असा हा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील.











