नांदेड प्रतिनिधी : १४ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासल्यावर या धक्क्यांची कुठलीही नोंद नसल्याचे आढळून आले. मात्र अधिक सूक्ष्म तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना याबाबत सखोल माहिती घेण्यास सांगण्यात आले.
आज दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी डॉ. विजयकुमार यांनी अभ्यास करून दिलेल्या अहवालानुसार, विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 15:57 तास व सायंकाळी 20:58 तास या दोन वेळा सौम्य भूकंपीय धक्क्यांची नोंद झाली आहे. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 1.9 व 2.3 एवढी नोंदविण्यात आली असून यांचा केंद्रबिंदू खैरगाव परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. विजयकुमार यांनी सांगितले की, हे धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असून यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अशा प्रकारचे कंपन हे बहुधा अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण किंवा उपशामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. देशातील अनेक भागांत दरवर्षी अशा स्वरूपाच्या घटना घडतात. तसेच “गूढ आवाज” येणे हीसुद्धा स्थानिक स्वरूपातील बाब असल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
तहसीलदार नायगाव यांनीदेखील या धक्क्यांमुळे कोणतीही हानी झालेली नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.
दरम्यान, मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्यांच्या घरांचे छत पत्र्याचे आहे आणि ज्यांनी आधारासाठी पत्र्यावर दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित ते दगड काढून सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रे बोल्टने घट्ट बसवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील काळात पुन्हा असा आवाज किंवा धक्का जाणवल्यास नागरिकांनी शांततेने मोकळ्या जागेत जावे आणि प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा. यासाठी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राचा दूरध्वनी क्रमांक (02462) 235077 असा जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना “अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाशी संपर्कात राहा” असे आवाहन केले आहे.












