नांदेड, दि. ३१ ऑक्टोबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
भारतीय एकतेचे प्रतीक आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत भव्य “रन फॉर युनिटी” दौड आयोजित करण्यात आली. “सरदार@150 एकता अभियान” या उपक्रमांतर्गत जुना मोंढा येथून पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत ही दौड पार पडली.
या दौडीत जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, नागरिक आणि पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उत्साह, देशभक्ती आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात “एक भारत – आत्मनिर्भर भारत” ही घोषणा गुंजत होती.
या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, तसेच विविध धर्मगुरु उपस्थित होते.
भारत सरकारच्या माय भारत या उपक्रमाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘सरदार@150 युनिटी मार्च’ या देशव्यापी अभियानाचे उद्दिष्ट युवकांमध्ये राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे.
या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि समाजकार्यातून ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित केले जात आहे.
या एकता दौडीतून नांदेड जिल्ह्यातील युवकांनी देशभक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
राष्ट्रीय एकात्मतेच्या बळकटीसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने युवा शक्ती एकत्र आणण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.












