नांदेड, दि. 28 ऑक्टोबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
“लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार तसेच पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून “रन फॉर युनिटी” (Run for Unity) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही दौड दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता सुरू होणार असून, जुना मोंढा टॉवर – महावीर चौक – वजीराबाद चौक – पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या धावण्यात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश देशातील ऐक्य, अखंडता आणि बांधिलकीचा संदेश देणे हा असून, सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
या निमित्ताने मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले आहे की,
“राष्ट्रीय एकता दिवसाच्या औचित्याने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मध्ये नांदेडकरांनी उत्साहाने सहभागी व्हावे आणि देशाच्या ऐक्याचा संदेश सर्वदूर पोहोचवावा.”
सदर उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, पोलिस दल तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा दृढ संकल्प प्रकट होणार आहे.












