नांदेड १२ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नांदेड शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहर वाहतूक शाखा वजीराबाद आणि इतवारा यांच्या संयुक्त मोहिमेत अवैध प्रवासी वाहन चालक, विनापरवाना वाहनचालक आणि वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ३ लाख ३४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
ही मोहीम पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार, शहरातील अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी वाहतूक शाखेच्या वजीराबाद व इतवारा विभागांना विशेष आदेश देण्यात आले होते.
दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिस निरीक्षक श्री. साहेबराव गुट्टे (शहर वाहतूक शाखा वजीराबाद) यांच्या पथकाने पोलिस अंमलदारांच्या सहकार्याने शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान ऑटो रिक्षा चालक, तसेच विनापरवाना वाहन चालविणारे व अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक यांच्यावर एकूण २५२ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ₹२,३३,७५० इतका दंड आकारण्यात आला.
दरम्यान, पोलिस निरीक्षक श्री. जगन्नाथ पवार (शहर वाहतूक शाखा इतवारा) यांनी जुन्या मोंढा, देगलूर नाका, इतर भागांमध्ये तपासणी मोहिम राबवली. त्यांनीही अशाच प्रकारच्या १०५ प्रकरणांवर कारवाई करून ₹१,००,२५० इतका दंड वसूल केला.
दोन्ही विभागांच्या संयुक्त मोहिमेत एकूण ३५७ प्रकरणांवर कारवाई करून ₹३,३४,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
ही मोहीम सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहर वाहतूक शाखा वजीराबाद, इतवारा आणि दंगल नियंत्रण पथकातील पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली.
या मोहिमेमुळे नांदेड शहरातील अवैध प्रवासी वाहनांवर अंकुश बसण्याची शक्यता असून, वाहतूक शाखेच्या या पावलाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.












