नांदेड, दि. २७ सप्टेंबर (प्रतिनिधी) :
दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नांदेडसह भोकर, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव व नायगाव तालुक्यातील एकूण २५ मंडळांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन रस्ते बंद झाले असून ग्रामसंपर्क तुटला आहे.
तालुकानिहाय परिस्थिती
- धर्माबाद तालुका : बेल्लुर येथे पूलावरून पाणी वाहत असून वाहतूक ठप्प झाली आहे.
- अर्धापूर तालुका : मोहे येथील शेतकरी संतोष धोंडबा कांबळे (वय ३०) हे शेतमाल वाचविताना पाण्यात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले.
- मुखेड तालुका : शिराजगाव येथील घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे नुकसान झाले, मात्र जीवितहानी टळली. दयाळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद.
- लोहा तालुका : उमरा क्षेत्रातील पूल पाण्याखाली असून उमरा ते स्पर्धिंग टांडा मार्ग बंद. उमरा गावाजवळ पुराचा पाणीस्तर वाढून १०० मीटर रस्ता वाहून गेला. सोमनाळा, हिंगोली नाका, उस्मान नगर व डोंगरगाव रस्त्यांवरील पूल पाण्याखाली. मंदिर परिसरासह अनेक ठिकाणी पूरपाणी शिरले.
- कंधार तालुका : बहादूरपुर येथे पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद.
- देगलूर तालुका : पाझर शिवारातील पूल वाहून गेला; गावांमध्ये संपर्क तुटला.
- नांदेड तालुका : रोहणा, कोठा, कासारखेड मार्गावरील पूल पाण्याखाली; ग्रामसंपर्क खंडित. नांदेड शहरातील मेनिफार्म, काळानगर, बालाजी मंदिर, टेलफोन एक्सचेंज आदी भागांत पाणी शिरले.
- हदगाव तालुका : शेलगांव पिंपी येथील तलाव तुटून रस्ता बंद.
- नायगाव तालुका : पाझर शिवारातील पूल पाण्याखाली जाऊन संपर्क तुटला. गोवर्धन व नवीकळमान गावांमध्ये यंत्रणा सतर्क.
वीजपुरवठा स्थिती
२७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वीज वितरण कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार —
१) जायकवाडी विसर्ग – ३८,००० क्युसेक
२) माळसंगाव विसर्ग – ८०,००० क्युसेक
३) दिघी धरण – २,००,००० क्युसेक
४) पूर्णा नदी (सिध्देश्वर + चडचडण + निम्न दुग्धाम) – ४५,००० क्युसेक
५) विष्णुपुरी धरण – १,५६,००० क्युसेक
६) नांदेड ओल्ड ब्रिज पातळी – ३४८.३४ मी (१,१७,००० क्युसेक)
७) बाळघाट – २,००,००० क्युसेक
पुढील अंदाज
विष्णुपुरी प्रकल्पातून सध्या १,६०,००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पुढील ६ ते ७ तासांत आणखी २ लाख क्युसेक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड शहरातील नदीकाठच्या भागांमध्ये पाणी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाची सूचना
नदीकाठच्या सर्व नागरिकांना व गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनतेने प्रशासनाशी सहकार्य करून सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे.












