नांदेड दि. 1 ऑक्टोबर : आज दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी धरणातून 2.00 लक्ष क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांमध्ये पाणी साठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाने दिली आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोडावरी नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. येत्या दोन दिवसांत नदीच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी धरणातून उद्या दि. 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 नंतर 3.50 ते 4.00 लक्ष क्यूसेक इतका विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोडावरी नदीची इशारा पातळी 351 मीटर असून धोक्याची पातळी 354 मीटर आहे. सद्यस्थितीत नदीची पातळी धोक्याच्या जवळ पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी अफवा पसरवू नये तसेच कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये. वस्तुनिष्ठ माहिती मिळविण्यासाठी सिंचन भवन, नांदेड येथील नियंत्रण कक्षाशी 02462-263870 या क्रमांकावर संपर्क साधावा.
— ✍️ नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड












