नांदेड, दि. २८ ऑक्टोबर (प्रतिनिधी – माधव वाघमारे) :
मराठवाड्यातील नांदेडकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी! येत्या १५ नोव्हेंबरपासून नांदेड-मुंबई आणि नांदेड-गोवा या दोन्ही विमानसेवा सुरू होणार आहेत. या विमानसेवेमुळे नांदेडकरांना आता फक्त एका तासाच्या उड्डाणात मुंबई आणि गोवा गाठता येणार आहे.
ही महत्त्वपूर्ण मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली होती. अखेर केंद्राने ही मागणी मान्य करताच चव्हाण यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची माहिती दिली.
मुंबई-नांदेड उड्डाण वेळापत्रक:
- मुंबईहून उड्डाण – दुपारी ४:४५ वाजता
- नांदेड येथे आगमन – सायंकाळी ५:५५ वाजता
- नांदेडहून परतीचे उड्डाण – सायंकाळी ६:२५ वाजता
- मुंबईत आगमन – रात्री ७:३५ वाजता
गोवा-नांदेड उड्डाण वेळापत्रक:
- गोव्याच्या मोपा विमानतळावरून उड्डाण – दुपारी १२:०० वाजता
- नांदेड येथे आगमन – १:०० वाजता
- नांदेडहून परतीचे उड्डाण – दुपारी १:३० वाजता
- गोव्यात आगमन – २:४० वाजता
या विमानसेवेच्या सुरूवातीमुळे नांदेडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यटन, व्यापार, शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रांनाही या सेवेमुळे नवीन गती मिळेल.
खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, “नांदेडला देशातील प्रमुख शहरांशी थेट जोडण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या दोन नवीन विमानसेवा सुरू झाल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला नवे पंख लाभतील.”
आता नांदेडकरांना मुंबई आणि गोवा फक्त एका तासाच्या अंतरावर!
प्रदेशातील नागरिकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.












