नांदेड, दि. ३ ऑक्टोबर :
राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात मोठा रोजगार उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या पुढाकारामुळे अनुकंपा भरती तसेच एम.पी.एस.सी. शिफारस उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली आहे.
या प्रक्रियेत गट ‘क’ संवर्गातील ७०, गट ‘ड’ संवर्गातील २२२, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेले ६४ उमेदवार, असे एकूण ३५६ उमेदवार शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.
शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुसूम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी वा कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरीची संधी देण्याचे अनुकंपा तत्वावरील सुधारित धोरण राज्य शासनाने लागू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेला गती देणे हा शासनाचा उद्देश असून, याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील ३५६ उमेदवारांच्या हाती नियुक्तीपत्रे सोपविण्यात येणार आहेत. ✅












