नांदेड,२२ फेब्रुवारी (प्रतिनिधी/माधव वाघमारे) : पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ वृत्तांकनापुरते मर्यादित न राहता समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देण्याचे सामर्थ्य आपल्या पंखात बाळगले पाहिजे, असा संदेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी दिला.
श्री गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना साबळे म्हणाले, “भारतात पत्रकारितेची परंपरा वर्षानुवर्षे जुनी असून या क्षेत्रात अनेक मान्यवरांनी निर्भीड आणि परखड पत्रकारिता करत समाजाला दिशा दिली. पूर्वी पत्रकारितेचे पारंपरिक शिक्षण उपलब्ध नसतानाही त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर कीर्ती कमावली. आज तुमच्यासारखे विद्यार्थी अद्ययावत शिक्षण घेऊन या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. हे शिक्षण तुम्हाला प्रगतीची अनेक क्षेत्रे काबीज करण्यासाठी सज्ज करते, मात्र समाजाभिमुख राहून प्रामाणिक पत्रकारिता करण्याची जबाबदारीही त्यातून पेलायला हवी.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव विकास तु. कदम, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. शेखर घुंगरवार, श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. देवदत्त देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विशेष असे की, नुकत्याच पार पडलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका राजश्री गोडबोले राक्षसमारे यांनीही या समारंभात उपस्थित राहून आपली पदवी स्वीकारली. पुरोगामी पत्रकार संघ, नांदेडचे जिल्हाध्यक्ष दीपक मठपती यांनीही यावेळी पदवी संपादन केली.
एकूण ६० विद्यार्थ्यांना बी.ए. (एम.सी.जे.), बी.जे.एम.एस. आणि एम.जे.एम.एस. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल धुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन नरवाडे यांनी केले. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा. सुरेश पाटील, डॉ. शुद्धोधन एडके, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. रवींद्र सिंग मोदी, प्रा. विपिन कदम, प्रा. रूपाली वागरे, प्रा. सोनम खोडके, प्रा. प्रतीक्षा चवणे, प्रा. रंजना बहादुरे, प्रा. बुद्धमाला हिंगोले, अनिल विनायते, विलास वाळकीकर, भरत सोनटक्के, फोटोग्राफर रोहन कहाळेकर, कुणाल भुरे, कुंटे आदित्य यांनी परिश्रम घेतले.












