नांदेड | २९ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
आगामी नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कडक इशारा जारी केला आहे. सोशल मीडियावर राजकीय पक्षांचे समर्थन, प्रचारात्मक पोस्ट, स्टेटस किंवा कोणत्याही प्रकारची राजकीय हालचाल केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. यामध्ये निलंबन, सेवेतून बडतर्फी अथवा कंत्राट रद्द होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक आचारसंहितेअंतर्गत कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काम करू शकत नाही, तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचारात सहभागी होणेही निषिद्ध आहे. “कोणाचे साहेब, कोणाचे भाऊ” अशा उल्लेखांसह राजकीय समर्थन करणारे स्टेटस, पोस्ट, रील्स, लाईक्स, शेअर्स यांनाही प्रचाराचाच भाग मानले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
सायबर सेलची २४ तास नजर जिल्ह्यातील सायबर सेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स—फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), व्हॉट्सअॅप—यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. राजकीय प्रचाराशी संबंधित मजकूर आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याची ओळख पटवून तात्काळ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही नियम लागू हा आदेश फक्त कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून कंत्राटी, मानधनावर काम करणारे कर्मचारी, आऊटसोर्सिंगद्वारे नेमलेले कर्मचारी यांनाही तितकाच लागू आहे. प्रत्यक्ष प्रचार, रॅली, बैठका, पोस्टर–बॅनर लावणे किंवा डिजिटल प्रचार करणे पूर्णतः बंदीस्त आहे.
आचारसंहितेचे ठळक नियम
- शासकीय कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार किंवा समर्थन करू शकत नाही.
- सोशल मीडियावर राजकीय पोस्ट/स्टेटस/शेअर/लाईक करणे निषिद्ध.
- निवडणूक काळात पूर्ण तटस्थता बाळगणे बंधनकारक.
- नियमभंग केल्यास निलंबन, विभागीय चौकशी, सेवेतून काढून टाकणे अथवा कंत्राट रद्द होऊ शकते.
जिल्हा प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, सेवेत असताना पूर्णपणे तटस्थ राहून केवळ शासकीय कर्तव्य बजावावे. अन्यथा “एक छोटी सोशल मीडिया हालचालही” नोकरीवर घाला आणू शकते, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.












