नांदेड, दि. 29 ऑक्टोबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागाने आज पहाटे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात ही कारवाई विष्णुपुरी परिसरात पहाटे सुमारे 5 वाजता करण्यात आली.
या कारवाईत महसूल पथकाला रेती उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 मोठ्या बोटी, 1 छोटी बोट आणि 4 इंजिन आढळून आले. महसूल पथकाने मजुरांच्या सहाय्याने 3 बोटी व 4 इंजिन जिलेटीच्या स्फोटाद्वारे नष्ट केले. तसेच 30 तराफे जाळून नष्ट करण्यात आले. या सर्वांचा एकूण अंदाजे 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.
याशिवाय, अवैध वाहतूक करणारी हायवा (एमएच 26 बीसी 4892) जप्त करण्यात आली असून, ती तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली आहे. संबंधित वाहनावर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वारकड यांनी दिली.
या कारवाईदरम्यान पोलिस विभागाचेही सक्रीय सहकार्य मिळाले. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, घुगे व जाधव यांचे पथक घटनास्थळी उपस्थित होते.
महसूल प्रशासनाने या कारवाईत अत्यंत दक्षता व कडक भूमिका घेतली असून, भविष्यात अशा अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध सक्तीने आणि कठोरपणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
डॉ. सचिन खल्लाळ (उपविभागीय अधिकारी), संजय वारकड (तहसीलदार), स्वप्निल दिगलवार (नायब तहसीलदार), मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा श्रीरामे, जमदाडे, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.












