भोकर, दि. १५ ऑक्टोबर : अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीतील मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भोकर तालुक्यातील पाळज गणेश मंदिर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत एक प्रशंसनीय पुढाकार घेतला आहे. संस्थेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या स्वाधीन करण्यात आला.
या वेळी तहसीलदार विनोद गुंडमवार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बंदेवाड, सचिव लक्ष्मण वझलवाड, कोषाध्यक्ष राजेश यालमवाड, उपसरपंच सुभाष चट्टलावार, सदस्य राजेश चुकाबोटवार आणि नर्सिंग आंदेवाड आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “अशा प्रकारच्या समाजाभिमुख योगदानामुळे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात आधार मिळतो. प्रशासन व समाज एकत्र आल्यास कोणतीही आपत्ती आपण नक्कीच पार करू शकतो.”
संस्थेने पुढेही सामाजिक कार्यात सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, या उपक्रमाचे स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.












