माहूर, दि. 26 ऑक्टोबर (प्रतिनिधी) :-
माहूर पोलिसांनी प्रचंड दक्षता आणि तत्परतेने कार्यवाही करत भाविकांच्या हरवलेल्या बॅगमधील सोन्याचे दागिने व नाणी मिळून एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून भाविकांच्या स्वाधीन केला आहे. या उत्कृष्ट कार्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
📍घटनेचा तपशील
दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साडे दोन वाजता माहूर येथील अष्टभुजादेवी मंदिराजवळील लक्ष्मी गेस्ट हाऊस समोर रस्त्यावर भाविक योगेश किशोर शिरसाट (रा. मंठ, जि. जालना) यांनी आपली बॅग चुकून हरवली होती. त्या बॅगेत सोन्याचे दागिने व नाणी मिळून एकूण ₹3,60,000 किंमतीचा मुद्देमाल होता.
👮♂️ पोलीसांची तातडीने घेतलेली कारवाई
या प्रकरणी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत तपासाचे आदेश दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली —
- अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील
- उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरण भोंडवे (उपविभाग माहूर)
- पोलीस निरीक्षक गणेश कराड (पो.ठाणे माहूर)
आणि त्यांच्या पथकाने पोलीस कॉन्स्टेबल चौधरी प्रकाश गेडाम सोनू भुरके अत्यंत काटेकोर तपास सुरू केला.
माहूर शहरातील विविध ठिकाणांवरील चौकशी, सीसीटीव्ही फूटेज तपासणी, तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शोध मोहिम राबवण्यात आली. अखेर गेस्ट हाऊस परिसरात हरवलेली बॅग सुरक्षित स्थितीत सापडली, त्यात सर्व सोन्याचे दागिने व नाणी तशाच अवस्थेत असल्याचे आढळून आले.
🙏 भाविकाचा पोलिसांप्रती आभार
आपली मौल्यवान बॅग परत मिळाल्याने भाविक योगेश शिरसाट यांनी माहूर पोलिसांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले की, “माहूर पोलिसांच्या तत्परतेमुळे माझा हरवलेला मुद्देमाल सुरक्षित मिळाला. त्यांच्या कार्याबद्दल मी ऋणी आहे.”
🏆 अभिनंदन व गौरव
या यशस्वी मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी विशेष कौतुक केले असून, अशा प्रकारच्या प्रामाणिक व संवेदनशील कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे सांगितले.












