नांदेड २४ मार्च (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खळबळजनक खुनाच्या गुन्ह्यातील मागील काही काळापासून फरार असलेल्या दोन सराईत आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. लोहा बायपास परिसरातून या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. सदर खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी लोहा बायपासवरील कंधारकडे जाणाऱ्या रोडच्या ब्रिजखाली थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला.
अटक करण्यात आलेले आरोपी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. अजय उर्फ बबलया भगवान माने (वय २६ वर्षे, रा. वसरणी, ता. जि. नांदेड)
२. निखील उर्फ चिंट्या रमेश घोरपडे (वय २१ वर्षे, रा. निमगाव, ता. अर्धापूर, ह. मु. वसरणी, ता. जि. नांदेड)
सदर आरोपींवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५०/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३, १०९, ३५३ व भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पीएसआय महेश कोरे, अंमलदार सुनील गटलैवार, श्रीराम दासरे, माधव माने, संघरत्न गायकवाड, सुधाकर देवकते आणि महेश बडगु यांचा समावेश होता. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.












