प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड – २६ फेब्रुवारी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत गृहभेद करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराया यांनी पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या पथकाला या मोहिमेसाठी सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक रवी वाहुळे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार माणिक यांना दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय माहितीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली. बातमीनुसार, घरफोडीच्या घटनांमध्ये सामील असलेले दोन आरोपी भोकर तालुक्यातील अल्लू नगर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून वरिष्ठांना अवगत करण्यात आले आणि लगेचच सापळा रचण्याचे आदेश मिळाले.
पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सागर सिंग उर्फ सागरसिंग उधलसिंग टाक (वय ३८, रा. हनुमान गल्ली, उमरी) आणि गजानन सिंग ठाकूर सिंग बावरी (वय २१, रा. उंबरी) यांचा समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी एक किलो वजनाची चांदीची चेन (अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये) असा एकूण २ लाख २९ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक बळीराम दासरे, माधव केंद्रे, गुंडेराव कारले, मिलिंद नरबाग, दिलीप कुमार चंचलवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे (सायबर सेल), तसेच पोलीस कर्मचारी दीपक ओढणे, राजू सिटीकर आणि रेश्मा पठाण यांचा सहभाग होता.
पोरलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत जुन्या गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराया यांनी ही मोहीम राबवली. आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यात (गोपनीय विना नंबर ३६७/२५) भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (चोरी) आणि ३३१ (गृहभेद) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांविरुद्धची ही कारवाई सुरूच ठेवल्याचे सांगितले.











