नांदेड (दि. 19 सप्टेंबर 2025) : नांदेड जिल्ह्यातील मागील दोन दिवसांपासून समाजात निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक, नांदेड मा. श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील विविध समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व पोलिस अधिकारी यांची शांतता व समन्वय बैठक घेण्यात आली.
बैठकीत बोलताना पोलिस प्रशासनाने सर्व समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, शांतता राखून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, जातीय किंवा भडकावू वक्तव्ये टाळावीत, तसेच सोशल मीडियावर अफवा, चुकीची माहिती प्रसारित करू नये. बैठकीत स्थानिक पातळीवर होणाऱ्या वाद विवादांवर त्वरित नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गावेकर, सामाजिक कार्यकर्ते व पोलिस यांच्यातील संवादाची गरज अधोरेखित करण्यात आली.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की, कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य, मोर्चे, सभा किंवा सोशल मीडियावरून चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच अफवांमुळे गावाबाहेरून कुणीही येऊन गावातील शांतता भंग करणार नाही, यासाठी स्थानिक नागरिकांनी जागरूक राहावे.
या बैठकीत विविध समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार समन्वय राखण्याचे व समाजात सौहार्दपूर्ण वातावरण टिकवण्याचे वचन दिले.
बैठकीस पोलिस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांच्यासह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री. चंद्रसेन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. दसरथ कपटे, श्री. भिमाशंकर कप्नाळे, श्री. सुमित कोठले, श्री. अमोल पाटील, श्री. संकेत पाटील, श्री. सुनील कदम, श्री. रामदास येवलेकर आदी पदाधिकारी व समाजातील मान्यवर उपस्थित होते.
शेवटी पोलिस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी आवाहन केले की, नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाशी सहकार्य करावे व सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक पोस्ट/स्टेटस टाळावे. कोणतेही वादग्रस्त प्रकार आढळल्यास संबंधित पोलिस स्टेशनला तात्काळ कळवावे.












