नांदेड 25 सप्टेंबर प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी( यलो) अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ सप्टेंबर २०२५ रोजी (ऑरेंज) अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
हवामान खात्याने कळविल्यानुसार,
- २५ व २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
- २७ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
खबरदारी म्हणून करा :
१) विजांच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्या.
२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत थांबा.
३) घरातील विद्युत उपकरणे बंद करा.
४) विजेचे खांब, तारांचे कुंपण व लोखंडी वस्तूं पासून दूर राहा.
५) पाण्यात उभे असल्यास त्वरित बाहेर पडा.
करू नका :
१) आकाशात विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका व नळ/पाईपलाइनला स्पर्श करू नका.
२) लोखंडी तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
३) उंच झाडाखाली आसरा घेऊ नका.
४) धातूंच्या मनोऱ्याजवळ उभे राहू नका.
५) घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून विजांचा कडकडाट पाहू नका.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाचा इशारा गांभीर्याने घेऊन आवश्यक ती खबरदारी बाळगणे अत्यावश्यक आहे.












