नांदेड, दि. 25 सप्टेंबर –
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल, घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज हदगाव, अर्धापूर, नांदेड व लोहा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली.
या दौऱ्यात मंत्री राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व धीर दिला. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
बाधित गावांची पाहणी
धानोरा (ता. हदगाव), चिंचबन (ता. अर्धापूर), नांदुसा (ता. नांदेड), शेवडी व भेंडेगाव (ता. लोहा) या गावांमधील पिकांचे नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. लोहा तालुक्यातील खराब झालेल्या पुल, विहिरी व रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील स्थितीचा आढावा
ऑगस्टपासून आतापर्यंत जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पूरामुळे अनेक गावांमध्ये बॅकवॉटरची परिस्थिती निर्माण झाली असून शेती व घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने 450 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. राठोड यांनी प्रशासनाकडून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
प्रशासनाला दिलेले निर्देश
- नुकसानीच्या मदतीच्या याद्या प्रत्येक गावात प्रसिद्ध कराव्यात
- खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा अहवाल शासनाकडे पाठवावा
- पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे करून पात्रांना आठवडाभरात मदत द्यावी
- शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तातडीने सुरू करावा
- गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
- दुरुस्त व नादुरुस्त रस्त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत
- मृत जनावरांच्या मदतीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा
बैठकीत उपस्थित आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडल्या, तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकसानीचा व मदतीचा आढावा सादर केला.












