नांदेड, दि. ७ ऑक्टोबर – नांदेड शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोर्णिमानगर येथील एका अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात घर सोडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून केवळ पाच तासांच्या आत त्या मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले. या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पोर्णिमानगर येथील महिलेने पोलिस ठाण्यात हजर होऊन तक्रार नोंदवली की, तिची अल्पवयीन मुलगी (वय १६ वर्षे) दुपारी घरातून रागाच्या भरात निघून गेली आहे. या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक डी. बी. पचवडे यांनी तत्काळ पथक तयार करून मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून आणि सखोल तपास करत मुलीचा मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला. शेवटी रात्री ११ वाजता मुलगी सुरक्षित अवस्थेत रेल्वे स्थानकाजवळ आढळून आली. पोलिसांनी तिला सुखरूप परत आणून तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.
या शोधकार्यात पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संतोष जोंधळे, पो.ना. साखरे, पो.ना. कांबळे पो.ना. माने, पो.क. शेख शोहेब पो.क. नांदगाव आणि पो. कॉ. टीमके व भुसे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या तात्काळ आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून, अल्पवयीन मुलांबाबत तत्परतेने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.












