नांदेड, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) :
गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच खून, बलात्कार व इतर गंभीर गुन्हे घडल्यास घटनास्थळी तात्काळ तपासासाठी फॉरेन्सीक पुराव्यांचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या कायद्यानुसार सात ते सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाकरिता आता फॉरेन्सीक पुरावे वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलात फॉरेन्सीक मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नांदेड पोलिस दलात या व्हॅनचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे.
आज दि. ०८/१०/२०२५ रोजी नांदेड पोलिस दलात उप विभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, फॉरेन्सीक मोबाईल व्हॅन दाखल झाली. सदर व्हॅनचे उद्घाटन पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव, उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
ही फॉरेन्सीक व्हॅन अत्याधुनिक रासायनिक विश्लेषण उपकरणे, डीएनए व रक्त नमुना तपासणीसाठी लागणारी साधनसामग्रीने सज्ज असून घटनास्थळी त्वरित पुरावे गोळा करण्यासाठी उपयुक्त आहे. या व्हॅनमध्ये प्रशिक्षित वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक व फॉरेन्सीक अधिकारी यांचा समावेश आहे.
या मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनमुळे घटनास्थळीच तपास प्रक्रिया जलद गतीने होईल. प्राथमिक निष्कर्ष तातडीने मिळाल्याने पुराव्यांचे संरक्षण व तपासाची पारदर्शकता राखली जाईल. तसेच न्यायालयीन कार्यवाहीतील विलंब टाळून तपास प्रक्रियेला गती मिळेल.
नांदेड पोलिस दलातील या नव्या तंत्रज्ञानयुक्त फॉरेन्सीक व्हॅनच्या कार्यान्वयनामुळे गुन्हे तपास अधिक वैज्ञानिक व प्रभावी होणार आहे. न्यायदानात पारदर्शकता आणि वेग वाढण्यास या उपक्रमामुळे मोठी मदत मिळणार आहे.












