नांदेड 14 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार नांदेड शहरात ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत विशेष पथके कार्यरत असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथक प्रमुख सपोनि श्री. भागवत नागरगोजे व विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी नांदेड शहरातील विविध भागांत पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई केली.
पोलीस ठाणेनिहाय कारवाईचा तपशील
- विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत – रामनगर, हातोडा चौक परिसरात 08 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वाहनांवर 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत – एम.आय.डी.सी., दूध डेअरी, दाबके कॉर्नर परिसरात 05 इसम मद्यप्राशन करताना मिळून आले. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली व संबंधित आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
- वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीत – बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात 02 इसमांवर मद्यप्राशन प्रकरणी कारवाई करण्यात आली.
- शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत – गोकुळनगर परिसरात 01 इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळून आला. त्याच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली.
- दामिनी पथकाची कारवाई – आर.आर.सी. कोचिंग क्लासेस परिसरात 02 इसम मद्यप्राशन करून गोंधळ घालताना आढळून आले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईदरम्यान शहरातील दारूची दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे अथवा दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हे गुन्हा असून, अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड शहरातील नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












