नांदेड | प्रतिनिधी : माधव वाघमारे | दि. १८ फेब्रुवारी २०२६
गोदावरी नदी पात्रात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत रेती माफियांना जबर धक्का दिला आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्राप्त गोपनीय माहितीनुसार विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकून पोलिसांनी अवैध रेती साठवणूक व वाहतुकीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४७/२०२६ अन्वये आरोपी गजानन हंबर्डे (रा. विष्णुपुरी) व इतर एक अज्ञात यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९ व १५, तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाप्यात ०५ ब्रास रेती (सुमारे २५,००० रुपये), एक इंजिन (३,००,००० रुपये), ०७ तार्पे (३,५०,००० रुपये) आणि एक छोटी लोखंडी बोट (१०,००,००० रुपये) असा एकूण १६,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपींनी नदीकाठी साठवलेली रेती व साहित्य तोडफोड करून नष्ट केल्याचेही आढळून आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव पो उप अधीक्षक इतवारा प्रशांत शिंदे नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, पो नि ओमकांत चिंचोलकर ग्रामीण व पो कॉन्स्टेबल पांचाळ आसिफ कांबळे यांच्या देखरेखीखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे केली. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अवैध रेती उपशावर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.












