नांदेड, दि. 1 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासामुळे एकाच व्यक्तीने चोरलेल्या 10 मोटार सायकलींसह तब्बल ₹5,20,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटार सायकल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक साधनांचा वापर करून आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी नवनाथ बालाजी वडजे (वय 23, रा. वडरवाडा ता. मुखेड, जि. नांदेड) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नांदेडसह विविध ठिकाणांहून 10 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून खालील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे
- गु.र.नं. 291/2024 कलम 379 भा.दं.वि.
- गु.र.नं. 525/2024 कलम 379 भा.दं.वि.
- गु.र.नं. 1185/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
- गु.र.नं. 1015/2025 कलम 303 (2) भा.स.सं.
- गु.र.नं. 1041/2025 कलम 303 (2) भा.स.सं.
- गु.र.नं. 1042/2025 कलम 303 (2) भा.स.सं.
- गु.र.नं. 551/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
- गु.र.नं. 217/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
- गु.र.नं. 158/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
या सर्व प्रकरणांतील चोरीच्या मोटार सायकली आरोपीने नांदेड आणि आसपासच्या भागातून चोरून विक्रीसाठी ठेवलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त केल्या. एकूण 10 मोटार सायकलींची किंमत ₹5,20,000/- असून सर्व मोटार सायकलींना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत शिंदे इतवारा पोलीस स्टेशन यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील विस्पुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
स.पो.नि. सुनील भिसे, पो.कॉ. गणेश साळुंके, पो.कॉ. एस आर.जाधव मिर्झा खलील बेग, पो.कॉ. हनुमंता कदम, व सिरमलवार सायबर सेल आदींचा विशेष सहभाग होता.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, नागरिकांना मोटार सायकल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.











