नांदेड, दि. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली काही माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेने खुलासा केला आहे.
सदर आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, निलंबित अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. मात्र काही माध्यमांमध्ये कोणताही अधिकृत आधार नसताना वेगळ्या प्रकारे व वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्या प्रकाशित झाल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी याबाबत स्पष्ट केले की, ही संपूर्ण बाब प्रशासकीय स्वरूपाची आहे. अशा बाबींवर अनधिकृत व आधारहीन बातम्या माध्यमांनी प्रकाशित करू नयेत. माध्यम प्रतिनिधींनी अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, असे त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, या संदर्भात युट्युब चॅनेलवर प्रकाशित झालेल्या बातम्या त्वरित डिलीट कराव्यात, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.












