नांदेड, दि. २९ ऑक्टोबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज दुपारी १:०४ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २९ ऑक्टोबर २०२५ या एकाच दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने यामुळे शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः ग्रामीण भागात शेतात काम करणारे शेतकरी, विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा पाण्यात उभे राहू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन पथके यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टनुसार पुढील काही तासांत वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि जोरदार पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे, तसेच विद्युत उपकरणांपासून दूर राहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नागरिकांनी सरकारी सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.












