दिनांक : ५ ऑक्टोबर २०२५
नांदेड, दि. ४ : जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये पूरस्थितीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच साथीचे आजार टाळण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत.
या आरोग्य शिबिरांना दि. ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून दि. ६ ऑक्टोबरपर्यंत पूरग्रस्त भागांमध्ये ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३७७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
३ ऑक्टोबर रोजी ४५ गावांमध्ये, तर ४ ऑक्टोबर रोजी १५ गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. ६ ऑक्टोबर रोजी आणखी ७ गावांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या शिबिरांमध्ये ३,९०० ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार देण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची विशेष तपासणी करण्यात आली.
या शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, कीटकजन्य व जलजन्य आजार, पोटदुखी, ताप, उलटी, अतिसार, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांची तपासणी करून उपचार व जनजागृती करण्यात आली.
आरोग्य विभागातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांनी ग्रामस्थांना परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याचे साठे कोरडे करणे, नाल्यांना वाहते ठेवणे आणि शुद्धीकरण केलेले पाणी वापरणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
दरम्यान, अर्धापूर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर शिबिराला आमदार श्रीमती जया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी भेट देऊन पूरग्रस्त जनतेशी संवाद साधला. त्यांनी सर्व आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
ही शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. श्रीकांत देसाई, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.











