नांदेड, दि. ७ ऑक्टोबर : स्वायत संस्था आर्टी आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन १२ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रांतिवीर लहुजी साळवे नगरी, डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम एक दिवसिय असून सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीत साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाचे राठोड, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मारुती वाडेकर, निमंत्रक गणेश अण्णा तादलापूरकर, गंगाधर कावडे, यशपाल गवाले, नामदेव कांबळे, प्रेमानंद शिंदे, प्रा. देविदास इंगळे, शिवाजी नुरुंदे, प्रीतम गवाले, दयानंद बसवंते, भारत खडसे आदी उपस्थित होते.












