नांदेड, दि. ७ ऑक्टोबर :
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली “सिटी रूट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत शहर व ग्रामीण भागात पोलिसांनी धडक कारवाई करून शांतता भंग करणाऱ्या इसमांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या मोहिमेदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी पाहणी करत शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नांदेड शहरातील विविध पोलीस ठाण्यांनी खालीलप्रमाणे कारवाई केली :
1️⃣ पोलीस ठाणे भाग्यनगर :
भाग्यनगर व भगीरथ नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या इसमांवर कलम 110/117 अन्वये कारवाई केली. तसेच हॉटेल, बार व दारू दुकाने तपासण्यात आली.
2️⃣ पोलीस ठाणे वजिराबाद :
वजिराबाद व बसस्टँड परिसरात २ इसमांवर शांतता भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. यावेळी हॉटेल व बार तपासण्यात आले.
3️⃣ पोलीस ठाणे इतवारा :
जुना मोंढा भागात २ इसमांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
4️⃣ पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण :
एमआयडीसी परिसरात ६ इसमांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई.
5️⃣ पोलीस ठाणे विमानतळ :
माला पेट्रोलपंप येथे १ इसमावर शांतता भंग केल्याबद्दल कारवाई.
6️⃣ दामिनी पथक :
दामिनी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान विसावा गार्डन आणि कटिंग येथे ७ इसमांवर सार्वजनिक शांतता भंग प्रकरणी कारवाई केली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.












