प्रतिनिधी/नांदेड
दि. 2 मार्च : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी सुरक्षेबाबत केलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करताना रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि गुन्हे गुप्तवार्ता शाखेने (CIB) लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) सहकार्यातून अनेक यशस्वी कारवाया केल्या आहेत. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली.
अल्पवयीन मुलाची सुटका
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत २८ फेब्रुवारी रोजी जालना रेल्वे स्थानकावर एका अल्पवयीन मुलाची सुरक्षित सुटका करण्यात आली. गाडी क्र. १२७१६ एक्सप्रेस स्थानकात आल्यानंतर आरपीएफच्या पथकाने एक अल्पवयीन मुलगा एकटाच प्रवास करताना पाहिला. त्याच्याबाबत कोणतीही माहिती सहप्रवाशांना नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या मोठ्या भावाला न सांगता घर सोडल्याचे सांगितले. आरपीएफने त्वरित कुटुंबीयांशी संपर्क साधून बालकल्याण समितीकडे (CWC) सुपूर्द केले.
चोरीचा प्रयत्न उधळला; तीन आरोपी गजाआड
‘ऑपरेशन यात्री सुरक्षे’अंतर्गत विभागात तीन महत्त्वपूर्ण कारवाया करण्यात आल्या. पहिल्या घटनेत परभणी रेल्वे स्थानकावर CIB नांदेड आणि RPF परभणीच्या पथकाने एका प्रवाशाचे सामान चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडून त्यास जीआरपीच्या स्वाधीन केले.
दुसऱ्या महत्त्वाच्या कारवाईत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी CIB नांदेड आणि GRP नांदेडच्या पथकाने फरार असलेल्या दरोडेखोरास अटक केली. आरोपीने नांदेड रेल्वे यार्डात एका प्रवाशास लुटून सोन्याची साखळी (किंमत ८० हजार रुपये), मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८ हजार ९९९ रुपयांचा ऐवज लुटला होता. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे.
तिसऱ्या कारवाईत छत्रपती संभाजीनगर स्थानकावर (CPSN) सवयीच्या पाकीटमारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे पाकीट व १० हजार ३०० रुपये रोख जप्त करून ते प्रवाशास परत करण्यात आले. आरोपीविरुद्ध बीएनएस-२०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरपीएफच्या या कारवायांमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा जवळच्या आरपीएफ कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












