प्रतिनिधी, माधव वाघमारे
जालना/नांदेड, दि. 19 फेब्रुवारी 2026: रेल्वे आरक्षण प्रणालीतील बेकायदेशीर दलालीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने (RPF) सुरू केलेल्या “ऑपरेशन उपलब्ध” अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. CIB/D&I, RPF नांदेड विभाग आणि RPF पोस्ट जालना यांच्या संयुक्त पथकाने काल, बुधवारी (दि. 18 फेब्रुवारी) जालना रेल्वे स्थानकावरील आरक्षण काउंटरवर छापा टाकून एका दलालाला रंगेहात ताब्यात घेतले.
विश्वसनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली. आरपीएफचे ASI श्री अमोल वावळे, कॉन्स्टेबल श्री रणजित सिंग (नांडेड), सहायक पोलीस निरीक्षक श्री विजय वाघ (परतूर @जालना) आणि आरपीएफ पोस्ट जालनाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे 11:20 वाजता पीआरएस (Passenger Reservation System) कार्यालयात ही विशेष तपासणी मोहीम राबविली.
यावेळी संशयित व्यक्तीची चौकशी केली असता तो जालना शहरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडून 1,270 रुपये किमतीची दोन रेल्वे आरक्षण तिकिटे, दोन भरलेले आरक्षण मागणी अर्ज तसेच पाच कोरे आरक्षण मागणी अर्ज जप्त करण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, तो मागील एक महिन्यापासून प्रवाशांना कमिशनच्या आधारे रेल्वे तिकिटे खरेदी करून देत होता. जप्त करण्यात आलेल्या दोन तिकिटांसाठी त्याने प्रवाशांकडून 630 रुपये कमिशन म्हणून घेतल्याचेही त्याने उघड केले.
आरोपीचा कबुलीजबाब नोंदवून जप्त केलेल्या कागदपत्रांचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी RPF पोस्ट जालना येथे आरोपीविरुद्ध रेल्वे कायद्याचे कलम 143 (दलाली) अन्वये गुन्हा क्र. 82/2026 नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 35(3) अन्वये नोटीस बजावून आवश्यकतेनुसार न्यायालयात हजर राहण्याच्या सूचनेसह सोडण्यात आले आहे.
नांदेड रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ अधिकृत रेल्वे काउंटर किंवा IRCTC सारख्या अधिकृत माध्यमांद्वारेच तिकिटे खरेदी करावीत. कोणत्याही दलालाचा सहाय्य घेऊन तिकीट काढल्यास आर्थिक फसवणुकीबरोबरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. दलालीचा संशय आल्यास त्वरित RPF किंवा रेल्वे पोलिसांना कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.












