नांदेड |२७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी नामनिर्देशन प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विविध निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उत्स्फूर्त हालचाल पाहायला मिळाली. दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल प्रक्रियेची माहिती महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क कक्षाकडून जाहीर करण्यात आली.
जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण हॉल, एस.टी. महामंडळ कार्यशाळा, श्री गुरु गोविंदसिंहजी स्टेडियम, कामगार कल्याण भवन, कापूस संशोधन केंद्र, उर्दू घर (मदिना नगर), महाराजा रणजितसिंहजी मार्केट तसेच क्षेत्रीय कार्यालये यांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी एकूण ६१९ नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली. त्यापैकी २५ नामनिर्देशन अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले आहेत. विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांची कार्यालयांमध्ये गर्दी दिसून आली. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक रंगत वाढताना दिसत आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून नामनिर्देशन प्रक्रिया शांततेत व नियमांनुसार पार पाडली जात असून सर्व कार्यालयांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुढील दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.












