नांदेड |१३ डिसेंबर प्रतिनिधी माधव वाघमारे
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे वाळू माफियावर कारवाई करत असताना प्रभारी तहसीलदारांवर हात उचलण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात संबंधित तलाठी प्रदीप पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या शिस्तीला आव्हान देणाऱ्या या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
दि. ५ डिसेंबर रोजी रात्री, अर्धापूर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाईसाठी प्रभारी तहसीलदार शिंदे हे पथकासह दाखल झाले होते. कारवाईदरम्यान वाळू माफियाशी संबंधित एक हवा आणि एक टिप्परसह एकूण चार वाहने जप्त करण्यात आली.
याच वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले तलाठी प्रदीप पाटील व पोलीस कर्मचारी शिवा पाटील यांनी तहसीलदार शिंदे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यामध्ये तलाठी प्रदीप पाटील यांनी थेट तहसीलदारांवर हात उचलून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर अर्धापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित पोलीस कर्मचारी शिवा पाटील यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. तर तलाठी प्रदीप पाटील यांच्याविरोधात अर्धापूर तहसीलदार कार्यालयाकडून चौकशी अहवाल व कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.
या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रशासनाची शिस्त व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तलाठी प्रदीप पाटील यांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश काढले आहेत. शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
या घटनेमुळे अवैध वाळू उत्खननाविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून, पुढील चौकशीत दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.












