प्रतिनिधी:२३ फेब्रुवारी माधव वाघमारे
नांदेड, दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ – नांदेड शहरातील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे आणि क्रिकेट या क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राज्य व राष्ट्रीय स्तरावर फडकावला आहे. शाळेतील तीन हुशार खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर केवळ शाळेचेच नव्हे, तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांची निवड झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कराटेमध्ये रुद्रराजचे वर्चस्व
शाळेतील १४ वर्षांखालील विद्यार्थी रुद्रराज नितीन पारदे याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत आपल्या अफलातून कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशस्वी वाटचालीची सुरुवात केली. त्याच्या या अपराजित कामगिरीमुळे आता मध्य प्रदेशातील इंदोर येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. रुद्रराजच्या या यशाने कराटे प्रशिक्षकांसह शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
क्रिकेटमध्ये अफान आणि युवराजची दमदार एन्ट्री
शाळेच्या क्रिकेटपटूंनीही आपली चमक दाखवून दिली आहे. १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय क्रिकेट संघाच्या निवड चाचणीत अफान शेखानी याने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. नाशिक येथे पार पडलेल्या कसोटी निवड प्रक्रियेत यशस्वी ठरत राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड निश्चित झाली आहे.
तर युवराज दत्ता रामरूपे याने आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर मोठी मजल गाठली आहे. गतवर्षी केंडन्स सारख्या नामांकित क्रिकेट अकादमीत निवड झाल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गुजरात येथे झालेल्या पाच राज्यांच्या आंतरराज्य स्पर्धेत त्याने केवळ चमकदार कामगिरीच केली नाही, तर दोन सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’ हा किताब पटकावून निवड समितीचे लक्ष वेधले. या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) महाराष्ट्र संघात झाली. त्यानंतर आता त्याने मुंबई, गुजरात, बडोदा, सौराष्ट्र आणि महाराष्ट्र या दिग्गज संघांसोबत विकेटकीपर व फलंदाज म्हणून वेस्ट झोन इंडिया संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी (कॅम्प) आपली निवड निश्चित केली आहे, ही नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे.
या तिन्ही विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महात्मा फुले हायस्कूलच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक तसेच क्रीडा शिक्षकांनी रुद्रराज, अफान आणि युवराज यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठा शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून नांदेड जिल्ह्याच्या क्रीडा क्षितिजावर नवीन आदर्श निर्माण झाले आहेत.












