नांदेड, दि. २९ ऑक्टोबर (प्रतिनिधी): माधव वाघमारे
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त “सरदार @150 एकता अभियान” (Sardar@150 Unity Campaign) अंतर्गत देशभरात राष्ट्रीय एकता, नागरिक जबाबदारी आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान जिल्हा आणि तालुका स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील दोन पथयात्रांचे आयोजन या अंतर्गत करण्यात आले असून, पहिली पथयात्रा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी व दुसरी ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. मा.श्री.राहुल कर्डीले जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि “मेरा युवा भारत – नांदेड” (MY Bharat – Nanded) या केंद्र सरकारच्या युवा अभियानाच्या माध्यमातून या कार्यक्रमांना चालना देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री मा. डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथून करण्यात आला. या अभियानाचा उद्देश तरुणांमध्ये एकता, नागरिक कर्तव्य आणि आत्मनिर्भर भारताची भावना दृढ करणे हा आहे.
या कालावधीत जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल फेस ऑफ, सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, तरुणांसाठी आरोग्य शिबिरे, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, वादविवाद आणि भारतीय एकतेवर प्रेरणादायी सत्रांचा समावेश आहे.
मा. कोडा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, युवा अधिकारी आणि विविध विभागांना या अभियानात सक्रिय सहभागाचे निर्देश दिले आहेत. तसेच युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण संस्था आणि नागरिकांना “एक भारत, आत्मनिर्भर भारत” या राष्ट्रीय संकल्पनेच्या पूर्ततेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा स्तरावर या उपक्रमात मेरा युवा भारत केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), भारत स्काऊट आणि गाईड, जिल्हा पोलीस विभाग, पोलीस प्रशिक्षण केंद्र, आरोग्य विभाग, नगरपालिका, तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
या अभियानाद्वारे तरुणांमध्ये देशभक्ती, एकता, सामाजिक जबाबदारी आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याची प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे.












